- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम २०१९ मध्ये सोयाबिन, उडिद, मूग, कापूस आदी पिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पिकविमा योजनेत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यापोटी विमा कंपनीकडून भरपाई दिली जात आहे; मात्र ती संरक्षित रकमेपेक्षा अगदीच अल्प प्रमाणात असून कापूस पिकाचे नुकसान होऊनही अद्यापपर्यंत त्याची भरपाई विमा कंपनीकडून देण्यासंबंधी कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून याप्रती संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात अॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून शेतकºयांच्या पिकांचा विमा उतरविण्यात आला. सोयाबिनसाठी प्रतिहेक्टर ८६० रुपये विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये प्रतिहेक्टर निर्धारित केलेली असताना शेतकºयांना मात्र १२ हजार ९६० रुपये प्रतिहेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळत आहे. उडिद आणि मूग या पिकांकरिता ३८० रुपये प्रतिहेक्टर विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम १९ हजार रुपये प्रतिहेक्टर होत असताना शेतकºयांना केवळ १८७१ ते १९२० रुपयांपर्यंतच प्रतिहेक्टर भरपाई मिळत आहे; तर कापूस या पिकाकरिता २१५० रुपये प्रतिहेक्टर विमा रक्कम आकारण्यात आली. त्याची संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये प्रतिहेक्टर निर्धारित करण्यात आलेली आहे; मात्र नुकसानाचे सर्वेक्षण होऊनही भरपाई देण्यासंबंधी कुठलाही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
खरीप हंगाम २०१९ मधील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून सोयाबिन, उडिद आणि मूग या पिकांसाठी १४५ कोटी रुपये मंजूर झाले. शेतकºयांच्या वैयक्तिक दाव्यांवरून खात्यात रक्कम जमा केली जात आहे. ही रक्कम नेमकी कोणत्या पद्धतीने मंजूर करण्यात आली, त्याची माहिती कंपनीकडे मागविण्यात आलेली आहे. तसेच कपाशीचे पीक कापणी अहवाल कंपनीकडे पाठविण्यात आले असून विम्याची रक्कम मिळण्यास वेळ लागणार आहे.- एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम