मालेगाव तालुक्यातील पुनर्वसित पांगरखेडा व घाटा या गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. ही समस्या निवारणासाठी नळयोजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे; परंतु ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुनर्वसित पांगरखेडा व घाटा गट ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची समस्या दूर करणे मोठ्या निधीशिवाय शक्य नव्हते. अशातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त रिसोड तालुक्यात आले होते. तेथे त्यांना पांगरखेडा, घाटा, गट ग्रामपंचायतीच्या सरपंच फलंगा रमेश चव्हाण यांनी निवेदन देऊन पाणीपुरवठा नळयोजनेसाठी निधीची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी पांगरखेडा घाटा नळयोजनेसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे सरपंच फलंगाबाई चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
-----------
मार्च महिन्यांत होणार काम सुरू
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी रिसोड तालुक्यातील भेटीदरम्यान विविध गावांतील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पांगरखेडा, घाटा ग्रामपंचायत सरपंच फलंगा चव्हाण यांच्या मागणीनुसार नळयोजनेसाठी केवळ ५० लाखांचा निधीच मंजूर केला नाही, तर समस्या लवकर निकाली लागावी म्हणून मार्च महिन्यापासूनच काम सुरू करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासनही दिले.