लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या ३७ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कारंजा तालुक्यातील अलिमर्दानपूर येथे १० जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वासुदेव श्रीराम कान्हेरे, असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.कारंजा तालुक्यातील अलिमर्दानपूर येथील वासुदेव श्रीराम कान्हेरे यांच्याकडे ४ एकर शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँके चे कर्ज आहे. यंदा कर्जमाफीच्या निर्णयानंतर बँकेत चौकशी केल्यानंतरही त्यांना अद्याप कर्ज मिळाले नव्हते. त्यातच यंदा सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे त्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. ती उलटल्यानंतर पुन्हा कसेबसे करून दुबार पेरणी केली; परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने ती पेरणीही उलटली. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. ९ जुलै रोजी ते घरातील खोलीत एकटेच झोपले, तर घरातील इतर मंडळी ओसरीत झोपली होती. सोमवारी सकाळी १० जुलै रोजी ते उशिरापर्यंत उठले नसल्याने त्यांची आई त्यांना उठविण्यास गेली असता खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांना वासुदेव कान्हेरे घरातील छतास गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. वासुदेव कान्हेरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या प्रकरणी वासुदेव कान्हेरे यांचे भाऊ प्रकाश कान्हेरे यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.