विळेगाव (कारंजा, जि. वाशिम): कारंजा तालुक्यातील विळेगावच्या वृद्ध दाम्पत्याची नावे श्रावणबाळ योजनेच्या यादीतून गायब झाल्यामुळे हे निराधार दाम्पत्य शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. विळेगाव खुळे येथे सागर अंबादास राठोड आणि अंबादास प्रताप राठोड हे निराधार वृद्ध दाम्पत्य राहते. या दाम्पत्याने शासनाच्या श्रावणबाळ योजनेंतर्गत शासकीय अनुदान मिळावे म्हणून या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी गावच्या तलाठय़ांमार्फत ११ ऑगस्ट २0१४ रोजी अर्ज पाठविला होता. तलाठय़ांनीही या संदर्भातील यादी तयार क रून आणि संबंधितांक डून आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून १४ लोकांच्या नावाची यादी तहसील कार्यालयाकडे सादर केली. यातील तीन नावे त्रुटीमध्ये वगळण्यात आली; परंतु सागर अंबादास राठोड आणि अंबादास प्रताप राठोड या दाम्पत्याची नावेच या यादीमध्ये नसल्याचे या संदर्भात तहसीलमध्ये चौकशी केल्यानंतर सांगण्यात आले. या वृद्ध दाम्पत्याने वयाची ७0 ओलांडली आहे. त्यांच्या मोठय़ा मुलाचा मृत्यू झाला, तर लहान मुलगा लग्नानंतर पत्नीसह मुंबईला निघून गेल्यामुळे हे दाम्पत्य पूर्णपणे निराधार झाले असून, निराधार असल्याने शासकीय योजनेंतर्गत आपल्याला मदत मिळावी म्हणून त्यांनी दोन-तीन वेळा अर्जही सादर केले; परंतु त्यांचे अर्ज नामंजूर झाले. त्यातच श्रावणबाळ योजनेच्या यादीत त्यांचे नावच नसल्याचे कळल्यामुळे हे दाम्पत्य निराश झाले असून, या धक्क्यामुळे वृद्ध दाम्पत्याची तब्येतही खालावली आहे. त्यांनी श्रावणबाळ योजनेसाठी दाखल केलेला अर्जच गहाळ झाल्याची शक्यता असून, या प्रकरणी जबाबदार अधिकार्यांनी काळजी घेऊन या निराधार वृद्ध दाम्पत्यास श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
श्रावणबाळ योजनेच्या यादीतून वृद्ध दाम्पत्याचे नाव गहाळ
By admin | Published: October 29, 2014 1:22 AM