शिरपूर (वाशिम) - शिरपूर येथे आयोजित आमदार चषक क्रिकेट सामन्यात शिरपूरचा आयएससी क्रिकेट संघ विजेता ठरला असून, वाशिमचा कोहिनूर संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २८ जानेवारीपासून शिरपूर येथील सलीम गवळी मित्र मंडळाच्यावतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यात जवळपास ७० संघांनी सहभागी नोंदविला होता. ६ फेब्रुवारीपर्यंत सामने चालले असून, ६ फेब्रुवारीला सायंकाळी विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. आयएससी संघ शिरपूर व कोहीनूर संघ वाशिम यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात कोहिनूर संघाने प्रथम फलंदाजी करीत ६९ धावा काढल्या. शिरपूरच्या आयएससी संघाने एक चेंडू राखून ७० धावा काढत विजेतेपद मिळविले. शिरपूरचा संघ हा ३१ हजार रुपयांचे बक्षीस व आमदार चषकाचा मानकरी ठरला. सलीम गवळी, माजी सरपंच राजू पाटील इंगोले, गणेश भालेराव, गजानन इरतकर, उपसरपंच असलम गवळी, बाबु गौरवे, संतोष बावीस्कर, बंशी इंगळे आदींच्या हस्ते प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात आले. तिसºया क्रमांकाचे बक्षीस वनोजा क्रिकेट संघ, चवथ्या क्रमांकाचे बक्षीस ओंकार संघ शिरपूर, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस अलिफ संघ शिरपूर, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस फे्रन्डस् शिरपूर तर सातव्या क्रमांकाचे बक्षीस के.जी.एन. शिरपूर संघाला देण्यात आले.