वाशिमसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, त्या तुलनेत कोविड रुग्णालय, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. आरटी-पीसीआर अहवाल मिळण्यासदेखील विलंब होत आहे. रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, प्लाझ्मा व रक्तपुरवठ्याची सक्षम यंत्रणा नाही आदी गैरसोयींमुळे रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाबाधितांवर वेळीच योग्य उपचार मिळावे याकरिता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावे, कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी, मागणीनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा आदी बाबींकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.
बॉक्स
एक कोटींचा निधी देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनुसार कोविड-१९साठी वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांसाठी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमातून एक कोटी रुपये वितरित करता येणार आहेत. हा निधी मिळाल्यास शासन नियमाप्रमाणे अमरावती आयुक्तांच्या माध्यमातून विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण करण्यात येईल, असे अॅड. सरनाईक यांनी सांगितले.