संतोष वानखडे
वाशिम : शासकीय कामकाज करताना मोबाइलचा (भ्रमणध्वनी) अतिवापर होऊ नये, तसेच जनसामान्यांत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून समान्य प्रशासन विभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कार्यालयीन वेळेत आवश्यकता असेल तरच मोबाइलचा वापर करता येणार आहे.
सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाइलचा वापर अपरिहार्य बनला आहे. मात्र, मोबाइलचा वापर करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले आहे. मोबाइलचा अतिवापर आणि शिष्टाचार पाळला जात नसल्याने शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलिन होण्याबरोबरच जनमाणसांतही चुकीचा संदेश जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मोबाइलच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाइलचा वापर करता येणार आहे. कार्यालयांतील इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवून सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करणे, सौम्य आवाजात बोलणे, कार्यालयीन कामासाठी शक्यतोवर लघू संदेशाचा (टेक्स्ट मेसेज) वापर करावा, समाजमाध्यमांचा वापर करताना वेळ व भाषेचे तारतम्य बाळगणे, अत्यावश्यक वैयक्तिक मोबाइल कक्षाचे बाहेर जाऊन घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात/बैठकीदरम्यान मोबाइल सायलेंटवर ठेवावा, तसेच मोबाइल व संदेश तपासणे टाळावे लागणार आहे. दौऱ्यावर असताना मोबाइल बंद ठेवता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
..................
अंमलबजावणीबाबत साशंकता
कार्यालयीन वेळेत मोबाइल वापराबाबत वरिष्ठस्तरावरून निर्देश प्राप्त झाले असले तरी याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने होईल का, याबाबत साशंकता वर्तविण्यात येत आहे.