वाशिम : काेराेना संसर्गामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्यात. मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये याकरिता माेबाइल, लॅपटाॅप, संगणकावर ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात झाली. माेबाइल व ऑनलाइन शिक्षण घेताघेता मुलांना माेबाइलचे वेड लागले असून तास न् तास ते माेबाइलमध्ये मश्गूल राहत असल्याच्या तक्रारी आता पालकांतून येत आहेत.
ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतांना बहुतांश पालकांना माेबाइल घेऊन देणे बालकांना शक्य हाेते. त्यामुळे सर्वाधिक बालकांनी माेबाइलवरून ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतले. यावेळी सुरुवातीला पालकांनी मुलांना माेबाइल कसा हाताळावा याचे शिक्षण दिले. आजच्या घडीला मुले माेबाइलमध्ये एवढे प्रवीण झाले की, ते पालकांना माेबाइलमधील ॲप्सचा कसा वापर करावा असे सांगत असल्याचे अनेक पालकांनी सांगितले. मुलांच्या अति माेबाइल वापराने पालक चिंतेत दिसत आहेत.
........................
माेबाइलचा अतिवापर धाेकादायक
ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक पालक बालकांच्या हाती स्मार्टफाेन देत आहेत. परंतु ऑनलाइन शिक्षण झाल्यानंतर बालक माेबाइलवर काय करताहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बालकांसाठी माेबाइलचा अतिवापर धाेकादायक आहे. त्यांच्या मेंदूवर, डाेळ्यांवर याचा परिणाम जाणवू शकताे.
-डाॅ. अनिल कावरखे, वैद्यकीय अधिकारी, जिसारु, वाशिम
.................
काेराेना संसर्गामुळे शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. याकरिता पाल्यांना नवीन माेबाइल घेऊन दिले. ऑनलाइन शिक्षण घेतांना त्यांना पाहिल्यास समाधान वाटायचे. परंतु आता त्यांना माेबाइलचे वेड एवढे लागले की हातचा माेबाइलच साेडत नाहीत.
-शालीकराम कढणे, पालक
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना माेबाइल हाताळता आले. कमी वयात माेबाइलचे ज्ञान प्राप्त झाले. परंतु आता ते गेम्स व विविध ॲप्सचा वापर करताना दिसून येत आहेत. नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.
-सुनील वकील, पालक
मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, शिक्षण प्रभावाहात रहावे याकरिता बालकांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यात आले. आता मात्र मुले, मुली चक्क माेबाइलवर राहत असल्याने काळजी वाटते.
-संताेष लांडगे, पालक
....................
काय करताहेत मुले माेबाइलवर....
ऑनलाइन शिक्षणामुळे बालकांच्या हाती पालकांनी माेबाइल दिले. यावर बालकांनी ऑनलाइन शिक्षणाचे धडेही घेतले. परंतु शिक्षणाचे धडे घेतांना बालके आता यू-ट्यूब, व्हाॅट्स ॲप, माेबाइल गेम्स, विविध साईटवर जाऊन तास न् तास माेबाइलमध्ये मश्गूल दिसून येत आहेत. यामुळे पालकांची डाेकेदुखी वाढली आहे.