रिसोड तालुक्यातील रिठद परिसरात असलेल्या खडकी ढंगारे येथील शेतकरी गजानन काशीराम ढंगारे (४५) हे २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान आपल्या शेतातून मोटरसायकलने आपल्या घरी येत होते. अशातच गावाजवळ आले असताना अचानक त्यांच्या मांडीवर विजेसारखा प्रहार झाल्याचे त्यांना क्षणात कळाले. यानंतर त्यांनी समयसूचकता बाळगून तत्काळ खिशातील जळत असलेला मोबाइल बाहेर फेकला. त्यानंतर त्या मोबाइलचा मोठा स्फोट झाला. मोबाइल बाहेर फेकल्यानंतर त्यांची मांडी चांगलीच भाजल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर त्यांनी तत्काळ उपचारांसाठी हॉस्पिटल गाठले. सदर घटनेत प्रसंगावधान राखल्याने आपण वाचलो. अन्यथा, ही घटना जीवावर बेतली असती, अशी आपबीती ढंगारे यांनी कथन केली. तसेच सदर मोबाइल कंपनीच्या विरोधात रीतसर तक्रार करून ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइलचा खिशात स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:38 AM