तालुक्यातील दुर्गम भाग तसेच ज्या गावांना पशुवैद्यकीय सेवा सहजरीत्या पुरविता येणे शक्य नाही व दळणवळणाच्या सुविधा अपु-या आहेत अशा गावांमध्ये कृत्रिम रेतन, औषधोपचार, आवश्यक लसीकरण इत्यादी पशू आरोग्य सेवा पुरविण्याकरिता फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी मिळाली होती. खासदार भावना गवळी, रिसोड पं. स. सभापती गीता हरिमकर यांनी २३ फेब्रुवारी रोजी हिरवी झेंडी दाखवून या पशू दवाखान्याचे लोकार्पण केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अजित शेलार तहसीलदार, गणेश पांडे मुख्याधिकारी नगर परिषद, पं. स. सभापती गीता हरिमकर, उपसभापती सुभाष खरात आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वरूप डॉ. शशिकांत कानफाडे, सहायक आयुक्त तालुका पशुवैद्यकीय लघू सर्व चिकित्सालय रिसोड यांनी केले. याप्रसंगी सहायक आयुक्त कानफाडे यांनी सांगितले की या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याची वाहने वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि रिसोड तालुक्याला मिळाली आहे. आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे तालुका लघू पशू सर्व चिकित्सालय यांनी मानले. यावेळी सुमित देशमुख पशुसंवर्धन पर्यवेक्षक पं. स. रिसोड, अशोक धारपवार पशुसंवर्धन पर्यवेक्षक भर जहागीर, एस. एस. घुगे सहायक पशुधन विकास अधिकारी, अंकुश माहुरकर, तनपुरे, पवन राजुरकर उपस्थित होते.
रिसोड तालुक्यात आता फिरता पशुवैद्यकीय दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:42 AM