वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पाचवी ते बारावीचे वर्ग बंद करण्यात आले असून, गत आठवड्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा लॅपटॉप, मोबाइल, टॅब आल्याचे पाहावयास मिळते.
सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. यादरम्यान जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणू संसर्ग झाला नाही. दरम्यान, गत आठवड्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढील आदेशापर्यंत पाचवी ते बारावीचे वर्ग बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने संबंधित शाळा प्रशासनाला दिल्या. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा मोबाइल, टॅब, लॅपटॉप आल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थी संख्या आहे.
००
कोट बॉक्स
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने नववी ते बारावीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात यावे, अशा सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आल्या. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येत आहे.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम
००
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात यावे, अशा सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळेतील जवळपास ५८ टक्के विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येत आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम
००००००००००
नववी ते बारावीच्या एकूण शाळा - ३६३
नववी ते बारावीचे एकूण विद्यार्थी -८२१५१
ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी-७४५००
००००
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा-८०६
पाचवी ते आठवीचे एकूण विद्यार्थी-८१,५१८
ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी-४६,४६५