वाशीम : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदू धर्मीयांच्या काशिचा कायापालट केला. आम्ही बंजारा समाज बांधवांची काशी पोहरादेवीचा कायापालट करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित ५९३ कोटी रुपयांचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, खासदार, आमदार, संत, महंतांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, आम्ही हेलिकॉप्टरमधून आज पोहरादेवीत लोकांचा समुद्र पाहिला. जिकडे तिकडे लोकच लोकं दिसून आले. ही एकीची जादू असून ती कायम राहू द्या. मी मुखमंत्री असताना पोहरादेवी विकासाकरिता १०० कोटींचा निधी दिला होता पण यापूर्वीचा सरकारने निधी देण्याबाबत हात आखडता घेतला. त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. ज्यांनी पैसे दिले नाही ते घरी बसले तर ज्यांनी पैसे दिले त्यांच्या हातात पुन्हा सत्ता आली, असे सांगून फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
बंजारा समाजाच्या विकासाकरिता लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी माझ्याकडे तिजोरीची चावी सोपवली, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेत
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारा बोली भाषेत केली . यावेळी एकच टाळ्यांचा गडगडाट झाला . तसेच वर्धा - नांदेड रेल्वेगाडी पोहरादेवीतून जाणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितल्याबरोबर उपस्थितांनी एकच जल्लोष केला .