मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी गोपाल गिरे यांच्या शेतालगत एक काळवीट चाऱ्याच्या शोधात भटकत होते. मोकाट कुत्र्यांना हे काळवीट दिसताच त्यांनी काळविटावर हल्ला केला. हा प्रकार गोपाल गिरे यांना दिसल्याने त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका केली आणि मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांना वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक पोले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले; परंतु काळवीट गंभीर जखमी झाल्याने वनविभागाचे कर्मचारी दाखल होण्यापूर्वीच काळविटाचा मृत्यू झाला होता.
------
वन्य प्राण्यांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले
शिवारात चारापाण्यासाठी भटकत असलेल्या वन्य प्राण्यांवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी नीलगाय आणि दोन माकडांचा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना वनोजा शिवारातच घडल्या होत्या. एकीकडे वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. तर वन्य प्राण्यांवर कुत्र्यांचे हल्लेही वाढले असताना वन विभाग मात्र यावर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात उदासीन असल्याचे दिसते.