वाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. याकरिता शिक्षण विभागानेही नियाेजन केले असले तरी आठवीतील बहुतांश विद्यार्थीवगळता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी ‘आई मला शाळेत जायचे नाय’ असा हट्ट करीत असल्याचे लाेकमततर्फे पालकांकडून त्यांच्या पाल्याचे शाळेत जाण्यासंदर्भात मत जाणून घेतले असता पुढे आले.
शाळा सुरू हाेत असल्याने काही विद्यार्थी उत्साही दिसून येत असले तरी अनेक दिवसांपासून काेराेना संसर्गामुळे घरीच असलेल्या पाल्यांना शाळेत जावेसे वाटत नसल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. असे असले तरी पालक मात्र विशेष खबरदारी घेऊन पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार असल्याचे त्यांच्यासाेबत केलेल्या चर्चेववरून दिसून आले. शाळेत न जाण्यासाठी बालके आई वडिलांना विविध कारणे सांगून शाळेत न पाठविण्यासाठी विनवणी करीत असल्याचे पालकांनी सांगितले. असे असले तरी मुलांचे भवितव्य पाहता पालक मात्र आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार असल्याचा निष्कर्ष चर्चेतून निघाला.
...............
दक्षता घेण्याच्या शाळा प्रशासनाला सूचना
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळा प्रशासनाला शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी मानकर यांनी सांगितले.
उत्साही विद्यार्थी करताहेत शालेय साहित्य खरेदी
काही विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्साही असून ते पालकांना शालेय पाेषाखासह इतर साहित्य खरेदीसाठी आग्रह करीत असल्याचे पालकांनी सांगितले.
............
माझा मुलगा राेहन इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून, शाळा सुरू हाेणार आहे हे कळल्याबराेबर ताे काेराेनाचे कारण सांगत शाळेत जाण्यासाठी नकार देत आहे. शाळेत न जाण्यासाठी विनवणी सुरू आहे.
- गजानन नाईकवाडे, वाशिम
माझी मुलगी मयुरी इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असून, काेराेनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू हाेणार असे कळल्याबराेबर मी शाळेत जाणार नाही, घरीच अभ्यास करेन. अद्याप काेराेना संपला नाही. मला कशाने काही झालं तर? असे प्रश्न करून शाळेत न पाठविण्याची विनवणी करीत आहे.
- राजू भाेयर, वाशिम
माझा मुलगा इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. काेराेनापूर्वीसुध्दा शाळेत जाण्याचा कंटाळा करायचा, शाळा बंद असल्याने त्याला आनंद वाटायचा. परंतु आता शाळा सुरू हाेणार, याची माहिती मिळाल्याबराेबर शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर चांगलीच आगपाखड करीत आहे. शाळेत जाणार नाही म्हणताेय.
- संताेष सावके, वाशिम
माझा मुलगा राेशन इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. शाळेची त्याला ओढ आहे. शाळा सुरू हाेणार असल्याची माहिती मिळाल्याबराेबर त्याचा आनंद गगनात मावेनासे झाला. शाळेत जाण्यासाठी आतुर असून, शालेय साहित्य खरेदीसाठी तगादा लावताेय.
- अशाेक ढाेरे, वाशिम