वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांची धूम असते. मात्र, कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षीही अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला असून, लग्न समारंभ लांबणीवर पडले आहेत.
यंदा १४ मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. पण, यावर्षीही कोरोनाचे संकट आडवे आले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने याकाळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. मात्र, कडक निर्बंध असल्याने बाजारपेठ कडकडीत बंद आहे तसेच लग्न सोहळ्याला केवळ १५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक असून, विनापरवानगी तसेच १५पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्यास संबंधितांविरूद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाईदेखील होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जाचक अटी यामुळे सलग दुसऱ्या वर्षीदेखील अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकणार असून, लग्नसोहळे लॉकडाऊन झाल्याचे दिसून येते.
००००
मे महिन्यातील लग्न मुहूर्त
मे - १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २५, २६, २८, २९ आणि ३०
०००००
नियमांचा अडसर
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. लग्न समारंभासाठी परवानगी घेणे, केवळ १५ व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी, मंगल कार्यालये बंद आदी नियमांमुळे लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. अनेकांनी लग्न समारंभ लांबणीवर टाकले आहेत.
०००
यंदा कर्तव्य नाही
कोरोनामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध असल्यामुळे लग्न समारंभ कसा आयोजित करावा? हा पेच कायम आहे.
- तुकाराम पाटील, वरपिता
.......
लग्न समारंभावर अनेक मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचे संकट, १५ व्यक्तींची उपस्थिती, परवानगी घेणे आदी बाबींमुळे लग्न सोहळा लांबणीवर पडत आहे.
- अजाबराव चव्हाण, वधूपिता
००००
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. मार्च ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. शहरात १७ च्या आसपास मंगल कार्यालये आहेत.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर उपस्थितीचे बंधन घालून मंगल कार्यालयांना परवानगी देण्यात आली.
परंतु, मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने उपस्थितीची मर्यादा आणि दंडात्मक कारवाई यामुळे मंगल कार्यालये पुन्हा लॉकडाऊन झाली. मे महिन्यापासून कडक निर्बंध असल्याने मंगल कार्यालये कुलूपबंद आहेत. परिणामी, आर्थिक गणित बिघडत चालले आहे.
०००००००००००००००००