अंचळ (वाशिम) : वानर टोळीने अख्या गावाला सडो की पडो करुन टाकल्याने अखेर गावकऱ्यांनी लोकवर्गणी करुन वानराची टोळी पकडणाºयाला (मंकी मॅन) औरंगाबाद जिल्हयातून बोलाविले. ‘मंकी मॅन’ने काही तासात गावात उपदव्याप माजविणाºया वानराच्या टोळीला जेरबंद करुन जंगलात सोडून दिले व अंचळवासियांना दिलासा दिला.रिसोड तालुक्यातील अंचळ या गावात अनेक वर्षांपासून माकडांचा उच्छाद सुरु होता. एवढयात जास्तच वाढल्याने ग्रामस्थांना औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड येथे एक ‘मंकी मॅन’ नावाने प्रसिध्द असलेला समाधान गिरी याबाबत माहिती मिळाली. सर्व ग्रामस्थांनी त्याच्याशी संपर्क साधला. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ३० हजार रुपये लोकवर्गणी केली. लोकवर्गणी झाल्यानंतर समाधान गिरी यांना पाचारण करण्यात आले. समाधान गिरी आल्यानंतर काही तासात त्याने २० ते २५ माकड असलेल्या टोळीला जेरबंद केले. आतापर्यंत या मंकी मॅनने ७० हजाराच्यावर माकडांना पकडून जंगलात सोडून दिले आहे.माकडाच्या टोळीची दहशत संपलीअंचळ गावात अनेक वर्षांपासून दहशत माजविणाºया माकडांच्या टोळीमुळे गावकरी त्रस्त झाले होेते. घरावरील टिनपत्र्यांवर उडया मारुन माकडांनी संपूर्ण टिनाचे नुकसान केले होते. नुकसानाबरोबरच ते लहान मुले, महिलांच्या अंगावरही येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतातील आंबे, पेरू, जांभळे व शेतपिकांची खूप नासाडी करत होते. ही टोळी पकडल्या गेल्याने नागरिकांतील दहशत संपली व गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘मंकी मॅन’ने माकडांच्या उपद्रवापासून केले गावकऱ्यांना मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:40 PM