मागील पाच वर्षीपासून सतत शेतकऱ्यांवर कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटे ओढवत आहेत. त्यात शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाकडून कुठला असा दिलासाही देण्याचे ठोस प्रयत्न होत नाहीत. पंतप्रधान पीक विमा योजनाही कुचकामी आहे, मागील वर्षी कापसावर बोंडअळी आली, तर सोयाबीन काढणीच्या वेळी अतिवृष्टीने झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचे नुकसान झाले.
पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, पीक विमा योजनेत झालेल्या अन्यायाविरुध्द मानोरा येथे बुधवार २१ जुलै रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात भीक मांगो मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मानोरा पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मनोहर राठोड यांचेसह महंत संजय महाराज, पंजाब चव्हाण, उमेश चव्हाण, शेषराव पवार,विनोद राठोड, बंडू राठोड,राहुल जाधव,विजय चव्हान,प्रेमसिंग जाधव, चेतन चव्हाण, छगन राठोड, प्रवीण राठोड, नितेश राठोड आदि शेतकरी सहभागी झाले होते.
----------------
तालुक्यांत विविध योजनांची मागणी
मानोरा तालुका हा कायमच उपेक्षित असून विकासाने कोसोदूर असलेल्या तालुक्यात शिक्षण, आरोग्य व सिंचनाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष असल्याने डोगराळ व घनदाट जंगलाने व्यापलेल्या या परिसरात वन्य प्राणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतातच आपले बिऱ्हाड घेऊन बस्तान माेडावे लागते. तेव्हा मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा मंजूर करावा, शेतीला तार कुंपणाची योजना मंजूर करावी, कर्ज वसुली थांबवावी, आदि मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.