लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत स्तरावर पाणी नमुने तपासणी मोहिम हाती घेण्यात आली असून, गत आठवड्यात २०० पेक्षा अधिक जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले.जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याचे स्त्रोत तपासण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले सर्व स्त्रोत तपासले जाणार आहेत़ पाण्यात कोणत्या क्षारघटकांची कमतरता आहे, ते तपासले जाणार आहे़ यासाठी जलसुरक्षा रक्षक कामाला लागले आहेत़ ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका जलसुरक्षा रक्षकाची नेमणूक केली जात असून पाणी तपासणी केल्यानंतरच नागरिकांना आपापल्या गावातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे लक्षात येणार आहे़ गत आठवड्यात जिल्ह्यातील दगडगाव, पिंपळगाव येथे पाणीनमुने तपासणी मोहिम राबविण्यात आली. पिंपळगाव येथे १० तर दगडगाव येथे सहा नमुने घेण्यात आले. यावेळी ग्रामसेवक हवा, जलसुरक्षक निलकांत टोम्पे, अक्षय रोकडे, ग्राम लेखा समन्वयक खंडारे आदींची उपस्थिती होती. सुकळी, यावली, धानोरा ताथोड येथे ग्रामसेविका राऊत, जलसुरक्षक पोहेकर, ग्रामलेखा समन्वयक खंडारे यांनी एकूण ४२ पाणी नमुने तपासणीसाठी घेतले. दोनद बु, तारखेडा, गणेशपूर आदी परिसरात ग्रामसेवक देवकते, जलसुरक्षक डुकरे यांनी पाणी नमुने घेण्यात आले. पोहा, वाघोला परिसरात आरोग्य सेवक मुंडे, जलसुरक्षक नवघरे, ग्रामलेखा समन्वयक खंडारे यांनी पाणी नमुने तपासणी मोहिम राबविली. मनभा, दिघी, जयपूर परिसरातील पाणी नमुने तपासणी मोहिम राबविण्यात आले. २०० पेक्षा अधिक जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले.
तपासणीसाठी २०० पेक्षा अधिक जलस्त्रोतांचे घेतले नमुने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 5:04 PM