गत महिनाभरापासून वनोजा येथील शिवाजीनगरासह इतर भागातील वीज पुरवठा दिवसातून दहा ते पंधरा वेळा खंडित होत आहे. त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसांत दोन रोहित्रे जोडूनही नेमका बिघाड लक्षात न आल्यामुळे शिवाजीनगरासह इतर प्रभाग अंधारातच असून, महावितरण कर्मचाऱ्यांची हलगर्जी व निष्क्रिय कारभारामुळे छोटे-मोठे उद्योग ठप्प होण्यासह जनजीवन विस्कळीत होत आहे. यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या महिलांना खूप त्रास सहन करावा लागत असून, वीज पुरवठ्यअभावी एका गर्भवती महिलेची मोबाइल बॅटरीचा आधार घेऊन प्रसूती करावी लागल्याची घटनाही येथे घडली आहे. त्यातच वनोजा हे गाव काटेपूर्णा अभयारण्यालगत असून, या ठिकाणी जंगली जनावरे व विषारी साप यांचा सतत वावर असतो. यामुळे रात्री अप्रिय घटनाही घडण्याची भीती आहे. अशी घटना घडल्यास याला महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून, येथील अनियमित वीज पुरवठ्याची समस्या तत्काळ न सोडविण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिले आहे. निवेदनावर वनोजा येथील असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदन देताना महादेव बेलखेडे, मयूर ठाकरे, अक्षय राऊत, सचिन राणे, संदीप गावंडे, आशिष राऊत, आकाश राऊत, ओम राऊत उपस्थित होते.
-------------
कोरोना लस निकामी होण्याची भीती
वनोजा येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आरोग्य केंद्रात साठवलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी निकामी होण्याची भीती आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कोरोनाची लस खराब होऊ नये म्हणून काही वेळेसाठी राजाकिन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवावी लागली होती.