०००००००००००००००
पिवळ्या मोझॅकची लक्षणे
रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या-हिरव्या रंगाचे मोठ्या आकाराचे चट्टे दिसतात व पाने पिवळी होतात. झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाहीत. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाण्यांद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होते.
०००००००००००००००००००
सोयाबीन मोझॅक विषाणूची लक्षणे
रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली असते. पाने आखूड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानांमध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. रोगग्रस्त झाडाला उशिरा फुलोरा येतो व फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाहीत. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाण्यांद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होतो.
०००००००००००००००००००
प्रतिबंधात्मक उपाय
१) रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावेत.
२) पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करावे.
००००००००००००००००००
नियंत्रणाचे उपाय
१) पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात १५ बाय ३० सेमी आकाराचे पिवळे चिकट सापळे एकरी १० प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष लावावेत.
२) रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडीच्या व्यवस्थापनाकरिता खालील रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
३) इमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकामाइड ५० टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम किंवा बायोमिथोक्झात २५ टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशके आलटून पालटून वापरावी. पायरेथ्रोइड कीटकनाशकाचा वापर टाळावा.
----
कोट: सोयाबीन पिकावर तुरळक प्रमाणात मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून त्याची माहिती घेऊन राेग व्यवस्थापन करावे.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.