- यशवंत हिवराळे राजुरा (वाशिम) : मालेगाव पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मारसुळ केंद्रातील उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या मंजुर सात पैकी सहा जागा तर गणित, विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकांच्या सर्वच्या सर्व जागा गेल्या अनेक वर्षापासुन रिक्त आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मारसुळ केंद्रामध्ये परिसरातील राजुरा, सुदी, अनसिंग, सुकांडा, ब्राम्हणवाडा, मारसुळ, गांगलवाडी पिंपळवाडी, भामटवाडी, देवठाणा, पांगराबंदी, सोनखास, इत्यादी गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी सहाय्यक शिक्षकांची एकुण ६१ पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची सात पदे, भाषेच्या पदवीधर शिक्षकांची सात पदे, गणित विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकांची सात पदे मंजुर आहेत. यापैकी उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची सहा तर गणित व विज्ञान विषयाच्या पदविधर शिक्षकांच्या सर्वच्या सर्व सातही जागा गेल्या अनेक वर्षापासुन रिक्त आहेत. त्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. येत्या २६ जुनपासुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत आहे. त्यातच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. अशा स्थितीत गावच्या शाळेतील महत्वपूर्ण घटक असलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे रिक्त असलेल्या पदांचे ग्रहण या सुटणार असा प्रश्न आहे.राजुरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये बहूतांश भुभाग हा घनदाट डोंगर दºयाने व्यापलेला आहे. शिवाय शहरापासुन हा परिसर थोडया अंतरावर असल्याने या भागातील शाळेवर येण्यासाठी शिक्षकवर्ग धजावत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी या भागातील अनेक शाळातील नमुद पदे गेल्या आठ दहा वर्षांपासून रिक्त राहत आहेत. या भागात पूर्व प्राथमिक उच्च दर्जाच्या खाजगी शाळाच नाहीत. शिवाय गावापासुन शहराचे असलेले अंतर, दळणवळणाची अपुरी व्यवस्था यामुळे या भागातील पालकांना विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळेशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. ही बाब जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासाठी फायदेशीर आहे. मात्र, रिक्त पदे असल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
राजुरा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील उच्चश्रेणी मुख्याध्यापकांसह पदविधर शिक्षकांचे पद गेल्या सात ते आठ वर्षापासुन रिक्त आहे. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांचे शिक्षणावर होत आहे ही रिक्त पद तात्काळ भरण्यात यावी.- तानाजी हिवराळे, पालक, राजुरा मारसुळ येथील रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. बदली प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरुन राबविली जात असल्याने किमान या सत्रात तरी रिक्त पदावर शिक्षकांची नेमणुक होण्याची शक्यता दिसत आहे.- आर.डी.शिंदेगटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मालेगाव