वाशिम : डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आॅनलाईन प्रणालीच्या या काळात प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असणे गरजेचे आहे. मात्र, अद्ययावत प्रशिक्षणाअभावी अनेक कर्मचारी अद्याप संगणक ज्ञानापासूनही दुरच आहेत. महसूल विभागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तलाठ्यांना देखील वेळोवेळी प्रशिक्षण मिळत नसल्याने ते अप्रशिक्षित राहत असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन कामांवर होत असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.महसूल विभागाकडून नागरिकांना दिल्या जाणारे विविध स्वरूपातील दाखले पुर्वी हस्तलिखीत असायचे. मात्र, त्यात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने शासनस्तरावरून सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार यासह अन्य महत्वाचे दाखले डिजिटल स्वाक्षरीसह ‘आॅनलाईन’ देणे सुरू झाले आले. याशिवाय महसूल विभागातील अन्य स्वरूपातील बहुतांश कामेही आॅनलाईन झाल्याने तलाठ्यांना अधिक सजग राहून काम करावे लागत आहे. हस्तलिखीत कामे बहुतांशी हद्दपार होऊन शासनाने तलाठ्यांना आता ‘लॅपटॉप’ देवून सर्व प्रकारची कामे त्यातूनच करण्याचे निर्देश दिले. असे असले तरी त्यासाठी लागणारे प्रशिक्षण मात्र वेळोवेळी मिळत नसल्याने अधिकांश तलाठी आजही संगणकीय ज्ञानात अप्रगतच असून त्यावर पर्याय म्हणून काही तलाठ्यांनी तर खासगी स्तरावर ‘आॅपरेटर’ ठेवून त्यांच्याकरवी कामे करण्याचा प्रकार अवलंबिला असल्याचे दिसून येत आहे.सद्या कार्यरत अनेक तलाठ्यांनी पुर्वीपासूनच हस्तलिखीत कामांवर अधिक भर दिला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंमलात आलेली आॅनलाईन स्वरूपातील कामे करित असताना त्यांना निश्चितपणे त्रास जाणवत आहे. मात्र, संबंधितांना वेळोवेळी प्रशिक्षण देवून प्रगत करण्याचे प्रशासनाचे सर्वंकष प्रयत्न आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
‘आॅनलाईन’च्या युगात बहुतांश तलाठी अप्रशिक्षितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:28 IST