वाशिम: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात १ जून पासून १९ जूनपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस पडला; परंतु त्याचा फारसा परिणाम जलसाठ्यांवर झालेला नाही. जिल्ह्यातील ७७ प्रकल्प अद्यापही ठणठण असल्याने या प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजना ठप्पच आहेत.
वाशिम जिल्ह्यात गत तीन वर्षांत सरासरी शंभर टक्के पाऊस झाला नाही. त्यातच मागील वर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. पाऊस कमी पडल्याने जलस्त्रोत आटले असताना कूपनलिका, हातपंप, विहीरीसारख्या खाजगी आणि सार्वजनिक जलस्त्रोतातून उपशाचे प्रमाण वाढले आणि त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला. त्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरपेक्षा अधिक खालावली. प्रकल्प कोरडे पडले होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आणि मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण धरून १ जून ते १८ जूनपर्यंतच्या कालावधित जिल्ह्यात २४ टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. यामुळे विहिरी, कूपनलिकांची पातळी थोडी वाढली असली तरी, रखरखत्या उन्हात आटलेल्या प्रकल्प क्षेत्रातील झालेली जमिनीची धूप आणि घटलेल्या भूजल पातळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत फारसा जलसाठाच झालेला नाही. त्यातच ७७ प्रकल्पांत अद्यापही शुन्य टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याने या प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना ठप्पच असून, या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांतील पाणीटंचाईची समस्या अद्यापही पूर्णपणे मिटलेली नाही. जूनच्या पूर्वार्धात पडलेल्या पावसामुळे गावशिवारातील विहिरीची पातळी वाढली असल्याने गावकरी त्यावरच आपल्या गरजा भागवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.