लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार लहान मुले अनुकरण करतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील वातावरणाचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर होतो. तसेच मातृभाषेतील शिक्षण व साहित्य हे माणसाचे व्यक्तिमत्व घडविते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. जटाळे यांनी केले. वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात १ ते १५ जानेवारी या कालावधीत आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ‘काव्याग्रह’चे व्यवस्थापकीय संपादक विठ्ठल जोशी, जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष अॅड. अमरसिंह रेशवाल, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. जटाळे पुढे म्हणाले, माता आणि मातृभाषा आपल्या जीवनाला दिशा देतात. मातृभाषेतील साहित्य वाचनाची आवड जोपासली पाहिजे. गेल्या १५ दिवसांमध्ये जिल्हा न्यायालयात आयोजित विविध उपक्रमांमुळे मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत लेखक, कवी यांचे विचार ऐकण्याची संधी न्यायिक अधिकारी व विधिज्ञांना मिळाली. या विचारांमुळे आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारण्यास मदत होणार आहे. परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून मराठी भाषा व साहित्याच्या अनुषंगाने झालेल्या मंथनातून मातृभाषेची महती, तिचे वैभव आपल्याला माहित झाले आहे, असे ते यावेळी म्हणाले. ‘काव्याग्रह’चे जोशी, अॅड. गवळी यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी न्या. एस.पी. शिंदे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, साहित्यिक प्रा. धोंडूजा इंगोले, किसन गंगावणे, कथाकार पांडुरंग मोरे, राजेश ठवकर, कवी महेंद्र ताजने, प्रा. सुनिता अवचार आदिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास न्या. एस.बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस.पी. बुंदे, न्या. एस.पी. वानखेडे, न्या. एस.व्ही. फुलबांधे, न्या. डॉ. यू.टी. मुसळे, न्या. के.बी. गीते, न्या. पी.एच. नेरकर, जिल्हा विधीज्ञ संघाच्या कोषाध्यक्ष अॅड. श्रध्दा अग्रवाल, सचिव यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव अॅड. प्रसाद ढवळे यांनी केले.
मातृभाषेतील साहित्य माणसाचे व्यक्तिमत्व घडविते - जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. जटाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:04 PM