वाशिम :
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून, जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवार (दि.२१) रोजी शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी वाशिम शहरात मोटार सायकल रॅली काढली. या रॅलीत शेकडो कर्मचारी, शिक्षकांचा सहभाग होतो. गत १७ वर्षांपासून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र त्यकाडे कायमच दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यस्थान, छत्तीसगड व झारखंड या राज्यातील २००५ नंतर शासन सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस रद्द करुन जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अशी मागणी राज्य कर्मचारी संघटनेने केलेली आहे. जिल्हा परिषद येथून काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले.
जुनी पेन्शन साठी कर्मचारी आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहेत. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी मोटारसायकल रॅलीचे काढण्यात आली. या रॅलीत महसूल कर्मचारी अध्यक्ष तात्या नवघरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजय धुमाळे, रवि सोनोने, लिपीक कर्मचारी विभागीय अध्यक्ष अमोल कापसे, जिल्हा अध्यक्ष नाना तुर्के, शिक्षक अध्यक्ष विजय मनवर, शिकारे, ग्रामसेवक अध्यक्ष गणेश बोरकर यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाली होते. यावेळी एकच पेन्शन जुनी पेन्शन, उठ मित्रा जागा हो, पेन्शन संघटनेचा धागा हो, एकच मिशन जुनी पेन्शन अशा विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली.