लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर ३१ तारखेच्या मुदतीपर्यंत तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे. यासाठी शासनाने मुदतवाढ दिली असतानाही खरेदी अद्याप सुरू झाली नाही. या संदर्भात चर्चा करून तात्काळ खरेदी सुरू करण्याच्या हालचाली जिल्हा सहाय्यक निबंधकांनी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह इतर संबंधितांची ८ जून रोजी वाशिम येथे बैठक आयोजित केली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी ६ जून रोजी पाठविले आहे.राज्य शासनाच्या २६ मे रोजीच्या निर्णयानुसार नाफेडच्या तूर खरेदीला ३१ मेपर्यंतची मुदतवाढ मिळाली होती. यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांकडून नाव नोंदणी करून शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत तूर खरेदीसाठी टोकण देण्याचे कामकाज करण्यात आले. त्या कालावधित जिल्ह्यातील सहाही नाफेडच्या केंद्रावर आलेल्या तुरीपैकी २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तुरीची मोजणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण असून, शेतकरी व शेतकरी संघटना या तुरीची मोजणी न झाल्यास आंदोलन करणार असल्याच्या तक्रारी बाजार समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही या संदर्भातील तक्रारी आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर ६ जून रोजी जिल्हा सहाय्यक निबंधक कार्यालयात सर्व बाजार समितीच्या सचिवांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात तात्काळ नाफेड तूर खरेदी सुरू करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यानुसार जिल्हा सहाय्यक निबंधकांनी नाफेड तूर खरेदी तात्काळ सुरू करणे, आजपर्यंत खरेदी केलेल्या तुरीच्या रकमा जमा करणे, नाफेडने खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणकीची व्यवस्था व खरेदी करणाऱ्या सबएजंटच्या समस्यांवर विचार करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसह एका बैठकीचेँ आयोजन केल आहे.