वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटरची संख्या अपुरी पडत आहे. आणखी काही कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्याआनुषंगाने सहा कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत गेला. जानेवारी २०२१ या महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होत फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. हा उद्रेक सध्याही सुरूच असून, सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. वाशिम शहरातील एका कोविड केअर सेंटर येथे बेड रिक्त नसल्याने सुरकंडी येथील कोविड केअर सेंटरवर रुग्णांना पाठविण्यात येत आहे. संभाव्य बिकट परिस्थिती लक्षात घेता तसेच रुग्ण खाटा अपुऱ्या पडू नये म्हणून तातडीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच दिले. त्याआनुषंगाने जिल्ह्यात आणखी काही सरकारी कोविड केअर सेंटर सुरू करता येइल का? यादृष्टीने चाचपणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आणखी सहा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, लवकरच सहा सेंटर रुग्णसेवेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
00000००००
बॉक्स ...
कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडचा अभाव...
जिल्हा स्त्री रुग्णालय आणि कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केअर सेंटरचा अपवाद वगळता उर्वरित कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचा अभाव आहे. या सेंटरमधील कुणाचे ऑक्सिजन कमी झाले किंवा कुणाला श्वास घ्यायला त्रास जाणवत असेल तर जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कोविड सेंटरला रेफर करण्यात येते. दरम्यान, एखाद्यावेळी रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेता तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे किमान तीन, चार ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी, असा सूर रुग्ण व नातेवाइकांमधून उमटत आहे.
००
खासगी कोविड रुग्णालयांची संख्या वाढविण्यावर भर ..
जिल्ह्यात सध्या जवळपास १२ ते १३ खासगी कोविड हॉस्पिटल आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि त्यातही तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा समावेश अधिक असल्याने खासगी कोविड रुग्णालयातही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड अपुरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आणखी काही खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगी देण्याचे नियोजन सुरू आहे.
०००
कोट बॉक्स..
जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी बेड अपुरे पडू नये म्हणून आणखी सहा सरकारी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.
- शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
०००
बॉक्स...
अशी आहे रुग्णसंख्या
एकूण पॉझिटिव्ह २१,२७४
सक्रिय रुग्ण ३,३७३
डिस्चार्ज १७,५७९
एकूण मृत्यू २२१
००००