लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभाग व आत्मा कार्यालयातर्फे वाशिम येथे आयोजित रानमाळ महोत्सवात शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलची पाहणी खासदार भावना गवळी यांच्यासह मान्यवरांनी केली.शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित केलेल्या शेतमालाबरोबरच शेतकरी बचत गटांनी तयार केलेले बियाण्यांचे स्टॉल मांडण्यात आले. यावेळी बचत गटाच्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा कृषी अधिकारी व खासदार भावना गवळी यांच्यासमोर मांडल्या. शेतकरी बचत गट व उत्पादक समूहाला बिजोत्पादन कार्यक्रम व बियाणे निर्मितीत शासनाने प्रोत्साहन दिले. आता बियाणे तयार झाल्यानंतर बाजारपेठ उपलब्ध नसल्याने बचत गट व उत्पादक समूहापुढे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे बियाणेदेखील बचत गट व शेतकरी उत्पादक समुहाकडून घेतले जात नाही. गतवर्षी प्रात्यक्षिकासाठी कृषी विभागाने शेतकरी बचत गटाने उत्पादित केलेले बियाणे घेतले होते. यावर्षी मात्र असे बियाणे घेण्यास नकार मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या समुहाने आता काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावर खासदार भावना गवळी यांनी, हा प्रश्न येत्या कॅबिनेटसमोर मांडून शेतकरी बचत गट व उत्पादक समुहाने तयार केलेले बियाणे कृषी विभागाने प्रात्यक्षिकासाठी घ्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची ग्वाही दिली. बचत गटाच्या बियाण्याला व स्वत: उत्पादित केलेल्या शेतमाल प्रक्रियेला कृषी विभागाने प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणीदेखील सरकारकडे करणार असल्याचे खासदार गवळी यांनी शेतकरी बचत गट समूहाचे पंजाबराव अवचार, सोनुबाबा सरनाईक यांना दिली.