वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट तातडीने सुरू करावा, अशा सूचना खासदार भावना गवळी यांनी आरोग्य विभागाला शुक्रवारी दिल्या. यासोबच नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन घरीच सुरक्षित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आरोग्य विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.
जिल्ह्यामध्ये दरदिवशी रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाला पायबंद व कोरोनाची साखळी तोडण्याकरीता जनतेने राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार गवळी यांनी केले. जिल्ह्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून, लोकांची गैरसोय होऊ नये, याकरिता संचारबंदी दरम्यान अत्यावाश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल, तरच घराच्या बाहेर पडावे, बाहेर कोरोना विषाणूचा राक्षस आपल्याला गिळंकृत करण्याकरिता ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. म्हणून नागरिकांनी घरीच थांबून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. रुग्णांची चिंताजनक वाढत्या संख्येमुळे खा.गवळी यांनी आरोग्य प्रशासनाची बैठक घेऊन आरोग्य प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा जालना व अमरावती येथून करण्यात येत होता. मात्र, तेथील रुग्णसंख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत. सद्यस्थितीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने अकोला येथून पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहेत, तसेच वाशीम येथे मंजूर असलेल्या ऑक्सिजन प्लँटचे काम थांबले होते. ते काम त्वरित सुरू व्हावे, याकरिता ऑक्सिजन कंपनीच्या व्यवस्थापनासोबत १४ एप्रिलपासून संपर्क साधून त्यांना वाशिम येथील ऑक्सिजन प्लँटला लागणारे कॉम्प्रेसर विनाविलंब त्वरित पाठवून देण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे, गुजरात येथून कॉम्प्रेसर निघाले असून, एक ते दोन दिवसांत वाशिम येथे पोहोचून पुढील आठवड्यामध्ये हा ऑक्सिजन प्लँट सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांकरिता लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे कोरोना रुग्णाकरिता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असून, रुग्णाच्या नातेवाइकांची रेमडेसिविरचे इंजेक्शन शोधण्याकरिता वनवन भटकंती होत आहे. कोरोनाच्या सर्वच रुग्णांना सदरचे इंजेक्शन देणे गरजेचे नसून, आवश्यक असणाऱ्या कोरोना रुग्णांस रेमडेसिविर इंजेक्शन देण्याबाबतच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी घाबरून न जाता, डॉक्टरांना आवश्यकतेप्रमाणे रुग्णांवर उपचार करू द्यावे, असे आवाहनही खा.गवळी यांनी केले.