मंगरुळपीर (जि. वाशिम), दि. १९ : महावितरणचे शेलूबाजार येथील कार्यालय हे कार्यालयीन दिवशी चक्क कुलूपबंद असल्याचा प्रकार 'लोकमत' स्टिंग ऑपरेशने शुक्रवारी उघडकीस आणला. यावेळी विविध कामानिमित्त आलेल्या वीज ग्राहकांना ताटकळत बसावे लागले. शेलूबाजार येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. कार्यालयीन दिवशीही सदर कार्यालय अनेकवेळा कुलूपबंद राहत असल्याची माहिती ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी १0.३0 वाजता महावितरणचे कार्यालय गाठले असता, धक्कादायक प्रकार समोर आला. दुपारी ३ वाजेपर्यंंंतही सदर कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. यावेळी शेलुबाजार परिसरातील पेडगाव, तर्हाळा, पिंप्री खु, कंझरा, गोगरी, शेंदुरजना मोरे, मजलापूर येथील २५ ते ३0 वीज ग्राहक उपस्थित होते. या ग्राहकांनादेखील दुपारी ३ वाजेपर्यंंंत ताटकळत बसावे लागले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका कर्मचार्याने कार्यालय उघडले. यावेळी वीज ग्राहकांशी संवाद साधला असता, अनेक गंभीर बाबी समोर आल्या. वारंवार चकरा मारुनसुद्धा आमच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला. पिंप्री खु. येथील वीज रोहित्र उभारून एक वर्ष लोटले; तरी त्यावर वीज जोडणी करुन दिली नसल्याचे ग्राहकांनी सांगितले. तर्हाळा येथे कृषिपंपाचा वीज पुरवठा गावठाण फिडरवर जोडल्यामुळे वीज पुरवठा व्यवस्थितपणे मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
महावितरणचे शेलूबाजार कार्यालय वा-यावर!
By admin | Published: August 20, 2016 2:23 AM