लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर वाशिम नगर परिषदेने शहरातील भाजीबाजार शहराबाहेर असलेल्या सुंदरवाटिकानजीकच्या मोकळ्या मैदानात हलविला. दरम्यान, दोन दिवसाच्या पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने रविवार, १४ जून रोजी भाजीबाजार रस्त्यावर भरला. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा झाला असून, अनेकांनी मास्क, रुमालचा वापरही केला नसल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील पाटणी चौकात भरणारा भाजीबाजार विविध ठिकाणी विभागला होता. त्यानंतर शहराबाहेर सुंदरवाटिका आणि लाखाळा परिसरात जूने आरटीओ कार्यालयाच्या प्रांगणात हा भाजीबाजार हलविण्यात आला. दोन दिवसाच्या पावसामुळे सुंदरवाटिकानजीकच्या मैदानात चिखल झाला. त्यामुळे १४ जून रोजी सुंदरवाटिकानजीक ते जवाहर नवोदय विद्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरच भाजीबाजार भरला. विविध प्रकारच्या भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. फिजिकल डिस्टन्सिंगही पाळण्यात आले नाही तसेच अनेकांनी मास्क किंवा रुमालचा वापरही केला नाही. काही विक्रेत्यांनीदेखील मास्क किंवा रुमालचा वापर केला नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे ठरत आहे. धोका अजून टळला नाहीजिल्हयात परराज्य, परदेशातून मोठ्या संख्येने नागरीक येत आहेत. यापैकी काही जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गामुळे नागरिकांनी सतर्क राहावेजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले.