कारंजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कामरगावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अवस्था मागील काही दिवसांपासून दयनीय झाली आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकासह पादचाऱ्यांना पायदळ चालणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कामरगावातील लाडेगाव ऑटोपॉइंट ते जयस्तंभ चौक या रस्त्यावरील खड्डे स्थानिक ग्रामपंचायतने मुरूम टाकून बुजविलेे; परंतु तो मुरूम मातीमिश्रित असल्याने व गेल्या चार-पाच दिवसांपासून सदर परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याच्या घटनांत वाढ झाली असून, अनेक वाहनचालकांसाठी रस्त्यावरील हा चिखल जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कामरगावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मुख्य रस्त्यावर चिखल; अपघातांचे प्रमाण वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:45 AM