लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक नालंदा नगर येथील अंगणवाडी केंद्राकडे जाणाºया रस्त्यावर चिखल होत असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नालंदा नगरातील महिलांनी २७ आॅगस्ट रोजी केली. पावसामुळे नालंदा नगरातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अंगणवाडी केंद्राकडे जाणाºया रस्त्यावरील पुलानजीक चिखल साचला आहे. त्यामुळे लहान मुले आणि महिलांची ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अंगणवाडीतील मुलांना हा रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिला व चिमुकल्या विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेता संबंधित यंत्रणेने रस्ता दुरूस्ती करणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप रस्ता दुरूस्ती केली नाही किंवा त्या ठिकाणी मुरूमही टाकला नाही. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नालंदा नगरातील दिपाली श्रृंगारे, गिता तायडे, वनिता गवई, जयश्री अंभोरे, सुनिता जाधव, कविता मोरे, उमा चेके, दीपमाला कल्ले, भावना कल्ले, बलखंडे, साळवे यांच्यासह महिलांनी केली.
नालंदा नगरातील रस्त्यावर चिखल; चिमुकल्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 3:41 PM