ग्रामीण भाग नागरी भागांशी जोडले जावे यासाठी मजबूत आणि दर्जेदार बांधकाम साहित्य वापरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा शुभारंभ काही वर्षापासून तालुक्यांमध्ये सुरू आहे.
तालुक्यातील अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए ला जोडणारा धावंडा सावळी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला आहे.या योजनेअंतर्गत सावळी धावंडा रस्त्यावर सावळीला लागूनच बांधण्यात आलेल्या पुलाची प्रचंड नासधूस हंगामातील पहिल्याच पावसात झाल्याने संपूर्ण धावंडा ते सावळी हा ग्राम सडक योजनेतील मार्ग कसा असेल याबद्दल या रस्त्याने ये-जा करणारे नागरिक व प्रवासी करीत आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पंचाळा चिखली दरम्यान बांधण्यात आलेल्या सडक योजनेवरील पुलातही नाल्यातील निकृष्ट दर्जाची वाळू वापरण्यात आल्याने या पुलांच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील रस्ते व पुलांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदार आणि यावर नियंत्रण असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे.