मालेगाव (वाशिम) : मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक तारीख घोषित होताच काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ 8 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी 7 ऑगस्ट रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
मालेगाव नगर पंचायतीमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला असे आरक्षित असल्याने सर्वच प्रमुख पक्षाच्या घडामोडींना वेग आला आहे. सध्या नगर पंचायतमध्ये काँग्रेसचे आमदार अमित झनक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप जाधव यांच्या युतीची सत्ता आहे. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. यावेळी नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा आहे. मात्र, यावेळी राजकीय घडामोडी बघता ऐनवेळी चमत्कार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी तसेच विरोधी गटाच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते. निवडणुकीसाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे. एकीकडे नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या रेखा अरुण बळी यांचे तर दुसरीकडे उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे संतोष जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळेच काँग्रेस-राकाँ युती कायम ठेवण्याचे आव्हान दिग्गज नेत्यांना पेलावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नगरसेवकाला अपात्र घोषित केल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 4 वरुन 3 झाले आहे. तर काँग्रेससोबत असलेली युती तोडून नगराध्यक्षपद घेण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते असल्याचीही जोरदार चर्चा आहे. या चर्चेच्या अनुषंगाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. शिवसंग्राम, शिवसेना, भाजप व अपक्ष उमेदवाराची भूमिकाही महत्त्वाची ठरणारी आहे. काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने 7 ऑगस्ट रोजीच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.