वाशिम : एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद झाल्याने ३० वर्षीय युवकाची हत्या केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर शहरातील मानोली रोड परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित या प्रकरणातील आरोपीला तीन तासातच अटक केली. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मानोली रोड वरील सतिष बाबाराव चव्हान यांचे कॉम्प्लेक्सच्या व्हरांड्यात अनोळखी युवक रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे व चमूने घटनास्थळाची जावुन पाहणी केली. मृतक हा मंगेश उर्फ गोलू विठ्ठल इंगळे रा. वडरपुरा मंगरुळपीर असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली.
मृतकाला दारू पिण्याची सवय असल्याची माहिती मिळाल्यावरून आजूबाजूच्या सर्व हॉटेल, धाबे, बियर बारवर चौकशी केली असता, १३ ऑगस्टच्या रात्री मंगेश ऊर्फ गोलू हा युवराज रमेश राउत रा. नविन सोनखास, मंगरुळपीर याचेसोबत रात्री दिसुन आल्याची माहीती मिळाली. यावरुन तात्काळ पोलिस स्टेशनच्या परिसरात संशयीत युवराजचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतक व आरोपीचे एका महिलेच्या अनैतिक संबंधातुन वाद झाले होते. सतिष चव्हान यांचे मानोली रोडवरील कॉम्प्लेक्समधे १३ ऑगस्टच्या रात्री अंदाजे १२ ते १ वाजताचे दरम्यान मृतक हा दारु पिवुन झोपलेला असताना, तेथीलच सिमेंट विटा डोक्यात मारल्या तसेच काचेची शिशी फोडुन मृतकाच्या गळ्यावर तिन ते चार वेळा वार केले, असेही चौकशीदरम्यान युवराज रमेश राउत याने पोलिसांना सांगितले. गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आली. मृतकाचा भाऊ महादेव विठ्ठल इंगळे यांच्या तक्रारीनुसार मंगरुळपीर येथे भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरूखुनाच्या या घटनेत ईतर कोणी संशयीत आहेत काय? याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुधाकर आढे, सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेंबडे, पोलिस उपनिरीक्षक दिनकर राठोड, कर्मचारी मोहम्मद परसुवाले, अमोल वानखडे यांनी या घटनेचा उलगडा केला.