कोरोना संसर्गाचे संकट उद्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण अभावानेच आढळायचे; परंतु गेल्या काही दिवसांत रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य नाही; पण प्रचंड खर्चिक व वेळप्रसंगी जीवघेणादेखील ठरू शकतो. ‘म्युकरमायसिटीस’ नावाची काळी बुरशी जमिनीवर अधिक; तर हवेत कमी प्रमाणात आढळते. ती प्रामुख्याने नाकावाटे श्वसनमार्गाने शरीरात प्रवेश करते. रोगप्रतिकारशक्ती कमी आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरात ही बुरशी सहज प्रवेश करून एकेक टप्पा ओलांडत मागील रक्तवाहिन्यांचा पुरवठा बंद करते. त्यामुळे रुग्णांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
.................
बाॅक्स :
‘म्युकरमायकोसिस’साठी औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध
‘म्युकरमायकोसिस’ आजार जडलेल्या रुग्णावर उपचाराकरिता किमान खर्च ८ ते १० लाखांच्या आसपास आहे.
रुग्णास ‘एम्फोटेरिसीन बी’ नावाची किमान साठ ते शंभर इंजेक्शन द्यावी लागतात. या इंजेक्शनसह डोळा व मेंदूला संसर्ग झाल्यास लागणाऱ्या औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.
....................
१३
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण
०२
‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू
...............
ही घ्या काळजी
‘म्युकरमायकोसिस’पासून बचावासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. रुग्णावर स्टिराॅइडचा वापर योग्य प्रमाणातच व्हावा. नियमित योगा, व्यायाम, पाैष्टिक आहाराने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून दूर राहता येणे शक्य आहे.
..................
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे
सर्दी, नाक बंद होणे, नाकातून रक्त वाहणे, चेहऱ्यावर सूज येणे ही म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे आहेत. माणसाच्या डोळ्याची एक नस सायनसमधून मेंदूपर्यंत गेलेली असते. ही नस काळ्या बुरशीमुळे बंद पडण्याचा धोका असतो. डोळे दुखणे, लाल होणे, सुजणे व अंधूक दिसणे यासारखा त्रास जाणवतो.
..............................
डाॅक्टर म्हणतात...
कोरोना विषाणू संसर्गापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे प्रस्थही वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. उपचारासाठी लागणारा पुरेसा औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. कोरोनातून मुक्त झालेल्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
..............
नाक, घसा, डोळे आणि शेवटी मेंदूवर हल्ला चढविणे हा ‘म्युकरमायकोसिस’चा प्रवास आहे. हे सर्व अवयव अत्यंत नाजूक असल्याने गरज पडल्यास शस्त्रक्रियादेखील करण्याची गरज भासू शकते. हा आजार जडलेल्या रुग्णांना किमान दोन ते तीन आठवडे रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डाॅ. संतोष काकडे, वाशिम
..............
मधुमेह नियंत्रणात असेल तर ‘म्युकरमायकोसिस’ होण्याची शक्यता तुलनेने फारच कमी असते. आजारापासून बचावाकरिता तोंड, नाक, दात नेहमी स्वच्छ ठेवावे. कुठल्याही आजारात कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करताना कटाक्षाने डिस्टील्ड वाॅटरचा वापर व्हावा. नियमित योगासने, प्राणायाम आणि संतुलित आहाराने ‘म्युकरमायकोसिस’पासून बचाव शक्य आहे.
- डाॅ. अरुण बिबेकर, वाशिम