लोकमत न्यूज नेटवर्क पांगरी नवघरे (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अमानी ते पांगरी नवघरे या दोन गावांना जोडणाºया रस्त्यादरम्यानच्या नाल्यास रविवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पूर आला. यामुळे मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली होती. चार दिवसांपूर्वी बुधवारी रात्रीही या नाल्यास पूर आल्याने वाहतूक नऊ तास ठप्प झाली होती. अमानी ते पांगरी नवघरेदरम्यानच्या मार्गावर नाला आहे. या नाल्यावर पांगरी नवघरे गावानजीक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाची उंची खूप कमी आहे. त्यामुळे थोडाही पाऊस आला की, नाल्यास पूर येऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. यामुळे अमानी-पांगरीदरम्यानची वाहतूक ठप्प होते. पांगरी नवघरे परिसरातील गावांचा मालेगाव शहराशी संपर्कच तूटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत; मात्र अद्याप प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि पुलाची साधी डागडुजीही केली नाही. या नाल्यास बुधवार १६ सप्टेंबर रोजी जोरदार पावसामुळे पूर आला आणि मार्गावरील वाहतूक नऊ तास ठप्प झाली. त्यानंतर रविवार २० सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा जोरदार पाऊस पडल्याने सोमवार २१ सप्टेंबर रोजी सहा तास वाहतूक ठप्प झाली. वारंवार हा प्रकार घडत असताना आणि ग्रामस्थ व शेतकºयांकडून पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ हताश झाले आहेत. ग्रामस्थ व शेतकºयांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सचिन नंदकिशोर नवघरे रामेश्वर मदन नवघरे, विकास नवघरे आदिंनी केली आहे. ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत गुरे गेली वाहून अमानी ते पांगरी गावाला जोडणाºया रस्त्यांवरील नाल्यास आलेल्या पुराने सहा तास वाहतूक ठप्प झाली असताना या मार्गावर गुरेही अडकून पडली होती. काही गुरांनी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता ती गुरे पूल ओसरण्याची प्रतीक्षा करणाºया ग्रामस्थांसमोर पुरात वाहून गेली. इतर गुरे हे चित्र पाहून पाण्यातून धावत बाहेर आल्याचे चित्र ग्रामस्थांनी पाहिले.
अतिवृष्टीमुळे नाल्यास पूर; वाहतूक सहा तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:00 PM