वाशिम - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनांमुळे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवरील नियंत्रणासाठी प्रस्तावित वळणमार्गाचे काम तसेच पडून आहे. वळणमार्गाअभावी अकोला-नांदेड या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वाशिम हे जिल्ह्याचे ठिकाण असून शहराच्या मध्यभागातूनच अकोला-नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गावर हैद्राबाद, नांदेड, पुणे, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांमधून येणाऱ्या जड वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाहनांना शहातील अंतर्गत रस्ता ओलांडूनच पुढे जावे लागत आहे. या रस्त्याची रूंदी कमी आहेत. त्यातच हा मार्ग शहरातील दोन मुख्य चौकांमधून जातो. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाºया वाहनांमुळे शहरांतर्गत धावणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो. वाहनांच्या गर्दीमुळे या चौकांत वेळोवेळी वाहतुकीची कोंडी होते आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांना होतो.
अकोला जिल्ह्यातून वेगळा होत वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून आजमितीस 20 वर्षांचा कालावधी झाला आहे. असे असताना अद्यापपर्यंत वाशिममध्ये वळणमार्ग तयार होऊ शकला नाही. वाशिम-अकोला मार्गावरील एका धाब्याजवळून थेट पुसद नाक्यापर्यंत वळणमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच्या सर्वेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी देखील प्राप्त झाला. परंतु त्यानंतर या प्रश्नाकडे कुणीही लक्ष पुरविले नाही. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शहरासाठी प्रस्तावित वळणरस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडून पाठपुरावाही करण्यात येत आहे.