वाशिम : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-लोकमान्य टिळक मुंबई विशेष द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने प्रवाशांची दिवाळीत सोय होणार आहे. मुंबई-नाशिकसाठी हिंगोली आणि वाशिमवरुन स्वतंत्र रेल्वेने नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीपूर्वी रेल्वे सुरु करावी, अशी मागणी वाशिमसह हिंगोली, अकोला जिल्ह्यातून होत होती. त्याची दखल घेत दक्षिण मध्य रेल्वेने विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरला वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार गाडी क्रमांक ०७४२६ नांदेड ते एलटीटी ही विशेष गाडी २३ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत नांदेड येथून दर मंगळवारी रात्री ९:१५ वाजता सुटून वाशिम येथे मध्यरात्री १:१४ मिनिटांनी पोहचून दुसऱ्या दिवशी एलटीटी येथे दुपारी १ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७४२७ एलटीटी-नांदेड विशेष एक्स्प्रेस २४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत धावेल. एलटीटी येथून दर मंगळवारी दुपारी १६:४० वाजता सुटून वाशिम येथे सकाळी ३:५४ वाजता पोहचून नांदेड येथे ९:३० वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक ०७४२८ नांदेड-एलटीटी २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी रात्री २१:१५ वाजता सुटून वाशिममध्ये मध्यरात्री १:१४ वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक ०७४२९ एलटीटी-नांदेड ही विशेष एक्स्प्रेस एलटीटी येथून २६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी दुपारी १६:४० वाजता सुटेल. वाशिम येथे शुक्रवारी सकाळी ३:५४ वाजता पोहचेल. या दोन्ही गाड्यांत वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर कोच असणार आहेत.
या स्थानकावर आहे थांबाहुजूर साहिब नांदेड-एलटीटी कुर्ला(मुंबई) एक्स्प्रेस गाड्यांना पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भूसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपूरी, कल्याण स्थानकावर थांबा असणार आहे.