लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग, अरुंद रस्ते, लघुव्यावसायिकांचे अतिक्रमण आदींमुळे रुग्णालयापर्यंत अग्निशमन वाहन नेण्यात अडचण येऊ शकते.भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी व खासगी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्राॅनिक वायरिंग व्यवस्था याबरोबरच रुग्णालय परिसरातील अतिक्रमण, रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग, अरुंद रस्ते आदी बाबीही चव्हाट्यावर येत आहेत. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालय आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुदैवाने अतिक्रमण नसल्याने वाहने येण्यास व जाण्यास कोणताही अडथळा येत नाही. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा व वाशिम शहरातील काही अरुंद रस्त्यालगत असलेल्या काही खासगी रुग्णालय परिसरात रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग होत. तसेच लघुव्यावसायिक हे विविध प्रकारची खेळणी व अन्य साहित्याचे हातगाडे, दुकाने थाटत असल्याने आपत्कालीन काळात अग्निशमन विभागाचे वाहन येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. रिसोड, मालेगाव, कारंजा शहरातील काही रुग्णालय हे मुख्य बाजारपेठ तसेच गल्लीबोळीत सुरू आहेत. यातील काही रुग्णालये अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. काही रुग्णालयांचे आपत्कालीन मार्गही अरुंद असल्याने अशा रुग्णालयास आग लागल्यास तिथे अग्निशमन विभागाची गाडी जाणेही कठीण होऊ शकते. स्थानिक प्रशासनाकडून रुग्णालयाची पाहणीच नाहीजिल्ह्यातील शहरांमधील गल्लीबोळात असलेल्या रुग्णालयापर्यंत आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन विभागाची गाडी पोहचू शकेल का? याची पाहणी स्थानिक प्रशासनाकडून झाली नसल्याची माहिती आहे..
अरुंद रस्त्यांमुळे रुग्णालयांची वाट बिकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:49 AM