वाशिम: नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाशिम तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयातील कल्याणी पांडुरंग गादेकर या विद्यार्थीनीने १४ वर्षांखालील ४१ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा लौकिक वाढविला. महाराष्ट्राला या स्पर्धेत मिळालेले एकमेव सुवर्णपदक ठरले. या यशाबद्दल शाळेच्यावतीने कल्याणीचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत कल्याणी गादेकरने उपांत्य सामन्यात हरियाणाच्या खेळाडूचा पराभव केला, तर अंतिम सामन्यात दिल्लीच्या खेळाडूना चीतपट करून सुवर्ण पदकावर नाव कोरत महाराष्ट्र राज्याचे नावे उज्ज्वल केले. तिला कुस्तीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुुंड, पुणेचे क्रीडा अधिकारी चंद्रबास स्वामी, माजी शिक्षणाधिकारी शांता शिंदे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, या शाळेतील सुदर्शन दत्तराव हराळ याने १७ वर्षांखालील ६३ किलो वजन गटात महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल खेळाडूंचा जयपूर येथे शाळेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.