संत सेवालाल महाराज यांच्या नावाने वनविभागाने तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पोहरादेवी-वाईगौळ या रस्त्याच्या दुतर्फा निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती मागील काही वर्षांपूर्वी केलेली आहे. निसर्गाचा समतोल टिकून राहावा, यासाठी या पर्यटन केंद्रामध्ये बहुमूल्य अशा वनसंपदेची लागवड २०१६-१७ या वर्षांत करण्यात आली. या पर्यटन केंद्राला चोहोबाजूंनी संरक्षण भिंतही उभारण्यात आलेली आहे. तसेच लक्ष ठेवण्याकरिता वन कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. सर्व बाजूने तार कुंपण व कर्मचाऱ्यांचा ताफा रात्रंदिवस गस्तीवर असतो. असे असताना आगीची घटना घडून वृक्षसंपदा नष्ट झालेली आहे.
वन पर्यटन केंद्राच्या शेजारी असलेल्या वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील वीज वितरिका वनपर्यटन केंद्रांमधून गेलेली आहे. या विजेच्या तारांमधील शॉर्टसर्किटने वनपर्यटन केंद्रामध्ये आग लागल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीला यापूर्वी वीज वितरिकांबाबत उपाययोजना करण्यासाठी भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ७२ नुसार नोटीस बजावण्यात आली. त्याऊपरही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळेच आगीची घटना घडल्याने नियमानुसार गुन्हेदेखील दाखल करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी दिली.