मंगरुळपीर: शहरातून जाणारे जिल्हा आणि राज्य मार्गासह नागरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण नागरीकांसाठी त्रासदायक झाले असल्याने ते अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत हे अतिक्रमण न हटविल्यास विविध संबंधीत शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक अतिक्रमण करून आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रशासनाला ३० जानेवारी रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.
निवेदनात नमूद आहे की, शहरात शासकीय जागेवर तसेच शहरातून जाणाºया राज्य महामार्ग,नागरी रस्ते,नगर पालिकेच्या हद्दीत खुल्या शासकीय जागेवर दिसेल त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.अतिक्रमण करण्याची मोहीम राजकीय कार्यकर्ते तथा असामाजिक तत्वाकडून राबविण्यात येत असल्याने शहरातील सर्व रस्ते अरुंद झाले आहेत. रस्ते वाहतुकीस योग्य नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे. शहराशिवाय शहरातून जाणाºया कारंजा,अकोला,मानोरा, वाशिम, मानोली रस्त्यावर अतिक्रमण धारकांची प्रचंड संख्या वाढली आहे. बांधकाम करून, लोखंडी शेड उभारून अतिक्रमण धारकांनी रस्ते व संपूर्ण शहराला वेढा घातला आहे. शाळा,महाविद्यालयास लागून पक्की अतिक्रमणे केल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थिनींना चिडीमारीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एखादी अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे ७ फेब्रुवारीपर्यंत हटविण्यात यावे, अन्यथा तहसील कार्यालय,पंचायत समिती,शासकीय विश्रामगृह,नगर परिषद कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय यांच्या प्रवेश द्वारावर प्रतिकात्मक अतिक्रमण करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राकाँचे तालुका अध्यक्ष आर. के. राठोड, माजी पं.स. सभापती भास्कर पाटील ,अरुणकुमार इंगळे,रमेश नावंधर,पं स सदस्य शेरुभाई फकिरावाले,वनिता चव्हाण,अनुसया डाहाने,मधुकर भगत,रमेश मुंजे,देवराव डाहाने, विष्णू चव्हाण,युनूस खान,दगडू नाईक,विश्वनाथ आटपडकर,बबनराव ठाकरे,साबीर फकिरावाले, किशोर वडते, उमेश मुंजे,प्रतिभाताई महल्ले,देवराव महल्ले,उत्तमराव इंगोले,महादेव ठाकरे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,ठाणेदार,पालिका मुख्याधिकारी,बांधकाम विभाग, पं स गटविकास अधिकारी आदींना देण्यात आल्या आहेत.