आसेगाव (वाशिम): भारनियमनासह विज पुरवठ्याबाबतच्या इतर समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी आसेगाव-मंगरुळपीर मार्गावर दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि मंगरुळपीरच्या उपविभागीय अभियंत्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्तारोको मागे घेण्यात आला.
आसेगाव उपकेंद्रातील शेतकरी व ग्रामस्थ वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. भारनियमनाचा उद्रेक सुरू असतानाच इतरही काळात वीज पुरवठा खंडीत होणे, उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, वीज पुरवठ्याअभावी प्रभावित झालेला पाणी पुरवठा, जीर्ण वीज तारा आणि खांब आदिमुळे आसेगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाºया गावातील शेतकरी व जनता हैराण झाली होती. या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसेगाव परिसरातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवारी आसेगाव-मंगरुळपीर मार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि मंगरुळपीरच्या उपविभागीय अभियंत्यांनी कृषीपंपाचे भारनियमन ४ तासांत विभागून देण्यासह पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन रोहित्र देऊन वीज पुरवठा अखंडीत ठेवण्याचे, मुख्यालयी अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे, जीर्ण वीज तारा आणि खांबांच्या दुरुस्तीचे आणि अतिरिक्त भारनियमन कमी करून नांदगाव पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन रोहित्र देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे हा रास्तारोको मागे घेण्यात आला.