शिरपूर जैन हे गाव जैनांची काशी म्हणून देशभरात ओळखले जाते. गावात असलेल्या अनेक धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था बनली आहे. त्यातच सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या काही ठिकाणी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने समस्येत अधिक भर पडली आहे. शिरपूर गावाचा विकास कामांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्याने विकास कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. पर्यटनाचा ब दर्जा प्राप्त असलेल्या शिरपूरची लोकसंख्या व विस्तार लक्षात, घेता गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या व रस्ते विकास कामांसाठी पर्यटन क्षेत्र विकास निधीतून अधिक निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.
............
अद्यापही विकास आराखडा तयार नाही
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक जनहित याचिका फेब्रुवारी २०१८ मध्ये निकाली काढली. यामध्ये अतिक्रमण निर्मूलन करून शिरपूर येथील विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी काही प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन करण्यात आले. मात्र अद्यापही विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. यासंदर्भात डिसेंबर २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी सुध्दा संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. यावर १३ जुलै रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी पर्यटन क्षेत्र शिरपूर येथील अतिक्रमण निर्मूलन करून विकास आराखडा तात्काळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याशिवाय येथील विकास होणे शक्य नसल्याचे याचिकाकर्ते ईमदाद बागवान यांनी सांगितले.
..............
पूर्वी केलेल्या नाल्या काही ठिकाणी सतत तुंबत आहेत. गावाची लोकसंख्या व विस्तार वाढतच आहे. हे लक्षात घेऊन येथे भूमिगत गटार योजना राबविणे गरजेचे आहे. भूमिगत गटार योजना व रस्ते विकासासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन भरीव निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- अमर देशमुख.
ग्रामस्थ, शिरपूर जैन.