रिसाेड शहरामध्ये सिव्हिल लाईन भागात पोलीस स्थानकाच्या डाव्या बाजूने जात असलेल्या अंतर्गत रस्त्यावर १०० बाय १०० आकाराचा विहिरीप्रमाणे सांडपाणी व कचरा मिश्रित खड्डा आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनाही अतिशय त्रास होत आहे. हाकेच्या अंतरावर पोलिसांचे सभागृह अस्तित्वात असून, यामध्ये पोलीस वास्तव्य करतात. यामुळे पाेलिसांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाला याचे काहीही देणे-घेणे नाही. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र, त्याची दखल न घेतल्याने नागरिकांमधून राेष व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेला शासनाच्या वतीने दरवर्षी एक कोटी रुपयांचा निधी येताे. तसेच शहरवासीयांकडून टॅक्स वसुली केली जाते. परंतु शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासन जागरूक नसल्याचे दिसून येत आहे.
नगर परिषदनजीकच्या जीवघेण्या खड्ड्याकडे दुर्लक्ष; आराेग्य धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:33 AM