रिसोड : केवळ निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन १५ घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत निविदा प्रक्रिया व अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २ आॅक्टोबर रोजी या घंटागाड्यांचे रितसर लोकार्पण करण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून रिसोड नगर परिषदेने एका वर्षापूर्वी १५ घंटागाड्या खरेदी केल्या. नवीन घंटागाड्यासंदर्भात निविदा काढण्यात न आल्याने या घंटागाड्या जागेवरच होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून नगर परिषदेचे लक्ष वेधले. याची दखल घेत निविदा प्रक्रिया व अन्य प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यात आले. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या मुहुर्तावर या घंटागाड्यांचे लोकार्पण मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या हस्ते झाले. यापूर्वी शहरात केवळ सात घंटागाड्या होत्या. आता नव्याने १५ घंटागाड्या दाखल झाल्याने प्रत्येक प्रभागात जाऊन कचºयाचे संकलन केले जाणार आहे. ३ आॅक्टोबरपासून या सर्व घंटागाड्यांची सेवा सुरू झाली. शहरात कोणत्याही ठिकाणी कचरा जमा होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे प्रशासन व कंत्राटदाराने स्पष्ट केले.
रिसोड शहरात नव्याने १५ घंटागाड्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:16 PM