वाशिम : स्तनपान हे बाळासाठी अत्यावश्यक असून, कोरोनाच्या काळातही नवमातांनी आवश्यक ती खबरदारी व सुरक्षितता बाळगून स्तनपान करावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला. ७ आॅगस्ट रोजी स्तनपान सप्ताहाचा समारोप करण्यात आला.आॅगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हरण यांच्या मार्गदर्शनात जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाचा समारोप ७ आॅगस्ट रोजी करण्यात आला. यावेळी मुख्य आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी कोरोना आणि स्तनपान याविषयी मातांना मार्गदर्शन केले. माता कोविड पॉझिटिव्ह असो वा नसो मातेने बाळाला स्तनपान केलेच पाहिजे, परंतू स्तनपान करतेवेळी मास्क लावावा, हात स्वच्छ धुवावे असे आवाहन त्यांनी केले. आईपासून बाळाला कोविडची लागण होण्याचे प्रमाण हे ३ ते ५ टक्के आहे. अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार मातेच्या प्लासेंटामध्ये व मातेच्या दुधामध्ये कोविडचे विषाणू आढळून आले; परंतू ते विषाण जीवंत नव्हते. म्हणून आई पॉझिटिव्ह असेल तर जन्माला येणारे बाळ कोविड पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण कमी आहे. कोविड पॉझिटिव्ह मातांनी स्तनपान करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. सौम्य लक्षणे असलेल्या मातांनी मास्क घालून, वारंवार हात स्वच्छ धुवून बाळाला स्तनपान करावे, तीव्र लक्षणे असलेल्या आईचे दूध घरातील दुसºया नॉन कोविड व्यक्तीने उकळून निर्जंतुक केलेल्या वाटी, चमच्याने बाळाला पाजणे, अतितिव्र लक्षणे तसेच आयसीयुमध्ये असलेल्या मातांचे दूध बाळाला न देता डॉक्टरांच्या सल्ल्याने पर्यायी व्यवस्था करावी, असा सल्ला डॉ. लाहोरे यांनी दिला. यावेळी आहारतज्ज्ञ अश्विनी भारसाकळे, लसीकरण विभागाच्या इन्चार्ज नागरगोजे यांच्यासह आरोग्य कर्मचाºयांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या काळातही नवमातांनी सुरक्षित स्तनपान करावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 6:09 PM