वाशिम जिल्ह्यात ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दरवर्षी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्यात निम्मे क्षेत्र हे सोयाबीनने व्यापलेले असते. त्यानुसार यंदाही सोयाबीनचाच पेरा अधिक होणार असल्याचे गृहीत धरून कृषी विभागाने त्यासाठी लागणारे बियाणे व खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आखले आहे. दरम्यान, खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनीही शेतात नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या कामांना वेग दिला आहे. वेळेवर धांदल उडू नये, म्हणून मे महिन्यातच बी-बियाणे, खत खरेदी करून ठेवण्यासाठी धावपळ सुरू आहे; मात्र १ एप्रिलपासून रासायनिक खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून नव्या एमआरपीचे खत बाजारात दाखल झाले आहे. ते खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने शेतकरी पुरते वैतागले आहेत. दुसरीकडे खताच्या प्रत्येक बॅगमागे मिळणारी मार्जीन कंपन्यांनी कमी केल्याने वाहतूक खर्चासह इतरही स्वरूपातील खर्च भागविणे अशक्य झाल्याने खत विक्रेतेही हैराण झाले आहेत.
....................
‘डीएपी’च्या बॅगमागे ७०० रुपयांची वाढ
गतवर्षी डीएपी खताची किंमत प्रतिबॅग १२०० रूपये होते. यावर्षी ते ७०० रुपयांनी वाढून १९०० रुपये झाला आहे. डीएपीसोबतच इतर सर्वच मिश्र खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते. यामुळे यंदा लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.